वैभव गायकर
पनवेल :खारघर शहरातील सेक्टर 11 परिसरातील पाण्याच्या पाईप लाईनजवळील झोपडपट्टी जवळ प्रतीक रविंद्र आहेर (वय 24) या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना शनिवारी रात्री 11 च्या सुमारास घडली .या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून आरोपी चौघा तरुणांना खारघर पोलिसांनी कोपरा गावातून अटक केली आहे.
विपीन ठाकूर (19),गोपाळ सिंग (23),अभिनंदन शर्मा (23), मुलच ठाकुर (23) अशी या चारही आरोपींची नावे आहेत.चारही जण काही दिवसापूर्वी कोपरा गावात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला आले होते.घटनेच्या वेळेस कोपरा गावाजवळील सीसीटीव्ही तपासले असता चारही जण कोपरा गावात शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाले असता त्यादिशेने तपास केल्यावर रविवारी या आरोपीना जेरबंद करण्यात आल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.
आरोपीकडून अग्निशस्त्र व जिवंत काडतूडे जप्त करण्यात आले आहेत.पेणमध्ये राहणारा हा तरुण इस्टेट एजंट चा व्यवसाय करणारा प्रतीक त्याच्या दुचाकीने (क्र. एम.एच झिरो 06 बी.एच 6399) खारघर याठिकाणी फिरण्यासाठी आलेला होता. रात्री 11 च्या दरम्यान वाशी येथून सायन पनवेल महामार्गाने पनवेलकडे जाताना कोपरा गाव बस स्टॉपच्या मागील रोडवर सिगरेट पीत असताना त्या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्तींनी त्याच्याकडे मोबाईल, पैसे व दुचाकीची मागणी केली. मात्र, प्रतिक यांने यास विरोध केल्याने एकाने जबरदस्तीने त्याच्यापासून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता एका आरोपीने प्रतिकच्या डाव्या पायाच्या मांडीवर गोळी झाडली होती.या आरोपीना काही तासातच अटक करून बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या या गँगच्या मुसक्या आवळण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक बिडवे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पढार,मानसिंग पाटील ,नरेंद्र बेलदार आदींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाने हि कामगिरी बजावली.हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी निवडला शॉर्टकट पोलिसांनी आरोपींना लुटमारीचे कारण विचारले असता नव्याने हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी हा लुटमारीचा पर्याय निवडला असल्याचे या आरोपींनी कबूल केले.या लुटमारीच्या पैशातून हॉटेल सुरु करण्याचा विचार या आरोपींचा होता अशी माहिती तपासात उघड झाली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.