मंगेश कराळे
नालासोपारा - शहरातील पश्चिमेकडील पाटणकरपार्क परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा नकली पिस्तुल दाखवून अंदाजे १५ तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती घटनास्थळी पोहचून पंचनामा करत गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील पाटणकर सिग्नलच्या बाजूला असलेल्या शत्रूंजय बिल्डिंगमध्ये सुरेशकुमार धाकड (५८) यांच्या मालकीचे नेकलेस ज्वेलर्स नावाचे सोन्याचांदीचे दुकान आहे. शनिवारी दुपारी पावणे दोन ते अडीचच्या दरम्यान दुकान मालक एकटेच असताना दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपीने दुकानात प्रवेश केला. दुकान मालकाशी बोलणे सुरू केले आणि बहीण येत असल्याचे सांगून दागिने पाहू लागला. त्याचवेळी त्याने हातात असलेले पिस्तूल काढून त्यांना दाखवले. दरम्यान, दुकान मालकाने आरोपीला प्रतिकार केल्याने दोघांमध्ये १० मिनिटे हाणामारी व झटापट झाली. तरीही आरोपीने अर्धा तास झालेल्या घटनेत अंदाजे साडे सहा लाखांचे १५ तोळे सोन्याचे दागिने लुटून पळून गेला आहे.
दुकान मालकाने आसपासच्या लोकांना मदतीचे आवाहन केले मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेला. विशेष म्हणजे या दुकानातील सीसीटीव्ही बंद होते. पोलीस आता ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे ते तपासत आहे. ज्वेलर्स दुकान मालकांनी सीसीटीव्ही सुरू ठेवून कोणीतरी मदतनीस व दुकानाबाहेर सुरक्षा रक्षक ठेवावा. तसेच दुकानात सायरन ही ठेवावा. जेणेकरून अप्रिय घटना झाल्यावर सुरक्षेसाठी वाजवता येईल असे आव्हान नालासोपारा पोलिसांनी केले आहे. घटनास्थळी ठाणे येथील डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट पथक येणार असल्याचेही कळते.
सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांचे पथके आरोपीचा शोध घेत आहेत. - चंद्रकांत जाधव (सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग)