नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडात १७ दिवसांनंतर दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. श्रद्धाच्या हत्येत वापरलेले शस्त्र पोलिसांनी सोमवारी जप्त केल्याचे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय हत्येनंतर आफताबने दुसऱ्या मुलीला भेट दिलेली श्रद्धाची अंगठीही पोलिसांनी जप्त केली आहे.श्रद्धा हत्याकांड प्रकरणात तपासाने वेग घेतला असून, पोलिसांनी सोमवारी आफताबने वापरलेले हत्यार जप्त केले आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर डेटिंग ॲपच्या माध्यमातून आणखी एक तरुणी आफताबच्या जाळ्यात फसली होती. ती आफताबच्या फ्लॅटवर आली होती. त्यावेळी फ्लॅटमधील फ्रीजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते. आफताबने तिला श्रद्धाची अंगठी दिली होती. ती पोलिसांनी जप्त केली आहे.
इतर घडामोडी... मित्रांना सांगितली ब्रेकअपची कहाणी : श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने मुंबईत तिच्या मित्रांची भेट घेतली आणि त्यांना ब्रेकअपची कहाणी सांगितली होती, असे वृत्त आहे. हत्येत आणखी एका व्यक्तीचा सहभाग? : श्रद्धाच्या हत्येनंतर पुरावे मिटविण्यासाठी आफताबला एका व्यक्तीने मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलिस याबाबत माहिती गोळा करत आहेत. मात्र, त्यांनी हा संशय कोणत्या आधारावर व्यक्त केला हे कळू शकले नाही. आफताबला अमली पदार्थ देणारा अटकेत? : गुजरात पोलिसांनी अमली पदार्थांचा तस्कर फैजल मोमीनला अटक केली आहे. तो आफताबला अमली पदार्थ पुरवायचा, असा दावा त्याने केला आहे. आफताबने अमली पदार्थ वापरले की नाही, याचाही समावेश तपासात केली जाणार आहे.