लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला तिहारच्या तुरुंग क्रमांक चारमध्ये ठेवले आहे. त्याच्यावर २४ तास सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. २६ नोव्हेंबरला आफताबने तुरुंगात पहिली रात्र काढली. प्रथमच गुन्हा करणाऱ्या आरोपींना तिहारच्या तुरुंग क्र. चारमध्ये ठेवले जाते. आफताबला दिल्ली न्यायालयाने शनिवारी १३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठविले. त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली असून, नार्को चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.
आफताब तुरुंग क्रमांक चारमध्ये एकटाच राहणार आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच आफताबला जेवण दिले जाईल. त्याच्या कक्षाबाहेर २४ तास एक गार्ड तैनात असेल. येथे आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे आरोपींवर २४ तास नजर ठेवली जाणार आहे. आफताबची नार्को चाचणी सोमवारी होण्याची शक्यता असून, त्यासाठी एफएसएलने संपूर्ण तयारी केली आहे. आफताबची आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नार्को चाचणी करण्यात येणार आहे. त्यापूर्वी वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नार्को चाचणी प्रक्रियेला तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो.