नवी दिल्ली/नालासोपारा : वसईच्या श्रद्धा वालकर (२७) हिची दिल्ली येथे तिचा प्रियकर आफताब पूनावालाने (२८) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, यासाठी त्याच्या कुकर्माचे पुरावे जमा करण्याची कसरत पोलिसांसमोर आहे. आता त्यासाठी सीसीटीव्ही शोधले जात आहेत आणि ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशीचे कपडेही पोलिसांना हवे आहेत. श्रद्धाची हत्या सहा महिन्यांपूर्वी झाली होती. तेव्हापासूनचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना हवे आहेत; पण फुटेजचे बॅकअप केवळ १५ दिवसांचे असल्याचे कळते. त्यामुळे आधीचे व्हिडीओ फुटेज मिळवण्यासाठी टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. श्रद्धाच्या कपड्यांचाही शोध सुरू असून, आफताबच्या फ्लॅटमधून पोलिसांनी तिच्या कपड्यांची एक बॅग जप्त केली आहे. तिच्या कपड्यांची आणखी एक बॅग पोलिसांना तिच्या वडिलांकडून हवी असल्याचेही समजते. ज्या दिवशी हत्या केली, त्या दिवशी आफताबने सगळे कपडे एका कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचेही समजते. त्यामुळे हा गुंता आणखी वाढत जाणार आहे. आफताबच्या नार्को टेस्टची तयारीश्रद्धाच्या बेपत्ता होण्याबाबत, तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटबाबत, तिचा खून नेमका कसा केला आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे घरात असतानाच मैत्रिणीसोबत केलेली मजा याबाबत आफताबने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. आफताबला घटनास्थळी नेऊन गुन्हा कसा घडला याची रंगीत तालीमही पोलिसांनी केली.
Shraddha Murder Case: आफताबच्या कुकर्माच्या पुराव्यांसाठी पराकाष्ठा, सीसीटीव्ही, कपड्यांचाही शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 8:10 AM