मुंबईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत हत्या झाल्याचे उघड झाले. श्रद्धा दिल्लीतील मेहरौलीमध्ये लिव्ह-इन मध्ये आफताबसोबत सोबत राहत होती. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केल्याचे समोर आले. या प्रकरणी आता अनेक मोठे खुलासे झाले आहेत.
श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धा वालकर जर भावनिक झाली नसती तर हत्येच्या दीड आठवडा आधीच म्हणजे १८ मे रोजीच आफताबने श्रद्धाचा खून केला असता, असा खुलासा आफताबने पोलीस चौकशीत केला आहे. हत्येच्या १० दिवस आधी आफताब आणि श्रद्धाचे भांडण झाले होते, त्याच दिवशी आफताबला तिचा गळा दाबून खून करायचा होता, पण अचानक श्रद्धा भावूक झाली आणि रडू लागली, त्यामुळे आफताबने खून करण्याचा निर्णय मागे घेतला.
आफताब दुसऱ्या कोणाशी जास्तवेळ फोनवर बोलतोय या कारणावरुन श्रद्धाची आणि त्याची भांडण व्हायची. आफताबच्या वागण्यात अचानक बदल झाला. आफताब आपली फसवणूक करत आहे अशी शंका श्रद्धाला येत होती. यावरुन या दोघांच्यात मोठी भांडणे सुरू होती.
आफताबच्या लॅपटॉपची फॉरेन्सिक तपासणीही सुरू आहे. आफताबने श्रद्धाचे शीर फ्रीजमध्ये वेगळे ठेवले होते. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो दररोज श्रद्धाचे शीर पाहत होता. मृतदेहाचे सुमारे १० अवयव सापडले आहेत. तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आढळून आले आहेत.
दिल्ली पोलीस श्रद्धाच्या वडिलांच्या रक्ताचे नमुने घेणार आहेत.यानंतर डीएनए तपासणी होणार आहे. फक्त एफएसएल डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
श्रद्धा आणि आफताबने मुंबईहून हिल स्टेशनला जाण्याचा प्लॅन बनवला होता. दोघेही हिल स्टेशनला भेट देण्यासाठी महिनाभराच्या टूरवर गेले होते. मार्च-एप्रिल महिन्यात श्रद्धा आणि आफताब हिल स्टेशनला गेले होते. हिमाचल भेटीदरम्यान आफताबची दिल्लीतील छतरपूर येथील बद्री या मुलाशी भेट झाली. त्यानंतरच श्रद्धा आणि आफताबने दिल्लीत राहण्याचा प्लॅन केला होता.
८ मे रोजी श्रद्धा आणि आफताब दिल्लीत आले. पहिल्यांदा पहाडगंज हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्यानंतर दक्षिण दिल्लीतील सैदुल्लाजाब भागात राहिले. त्यानंतर १५ मे रोजी दोघांनी छतरपूरमध्ये फ्लॅट घेतला आणि १८ मे रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली.