नालासोपारा : श्रद्धा वालकर (२७) हिच्या हत्येच्या दिवशी तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबला गांजा ओढण्याचे व्यसन होते. श्रद्धा त्याला नेहमी ओरडायची. त्यावरून अनेकदा त्यांचे भांडण व्हायचे. श्रद्धाची हत्या झाली, त्या दिवशी आरोपी आफताब हा गांजाच्या नशेत होता, अशी कबुली त्याने दिल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांचे दोन अधिकारी सकाळी माणिकपूर पोलिस ठाण्यात आल्याच्या माहितीला माणिकपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दुजोरा दिला आहे. दिल्लीतील दोन पोलिस अधिकारी येऊन भेटले. चौकशी करण्यासाठी ते आल्याचे त्यांनी सांगितले. या पथकाने माणिकपूर पोलिसांची तपासात मदत घेतली आहे.
दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याला चौकशीसाठी माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कार्यालयात बोलावले होते. चौकशीनंतर लक्ष्मण नाडर याने प्रसिद्धी माध्यमांना कोणतीही माहिती न देता तेथून तो निघून गेला. दरम्यान, श्रद्धा ही आफताबच्या प्रेमात पडल्यानंतर तिने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली होती. मात्र, कुटुंबीयांनी या प्रेम प्रकरणाला विरोध केल्यानंतर दोघेही काही काळ वसईतील एव्हरशाइन येथे भाड्याच्या घरात राहत होते. यावेळी आरोपीने घरमालकाला श्रद्धा ही आपली पत्नी असल्याची ओळख करून दिली होती. यावेळी त्याने कागदपत्रे सादर करताना आधार कार्ड आणि वसईतील वडिलांच्या घराचा संदर्भ दिला होता. स्वतःचा आणि श्रद्धाचा फोटोही करारपत्रावर लावण्यात आलेला होता. त्यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये ते घर सोडले होते. त्यानंतर, हे दोघे दिल्लीला निघून गेले होते, अशी माहिती उपलब्ध होत आहे.
तपासासाठी दिल्ली पोलीस वसईतश्रद्धाच्या हत्याकांडाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी सकाळी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात आले होते. दरम्य़ान, आरोपी आफताब पूनावाला याने वसई पूर्वेकडे भाड्याने घेतलेल्या घराच्या मालकाला श्रद्धाची ओळख पत्नी म्हणून करून दिली होती, अशी माहिती उघड झाली आहे.