नालासोपारा/नवी दिल्ली : ‘लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानाच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येऊ येत आहेत. श्रद्धा वालकरचा खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडार याने आपले जुलैमध्ये श्रद्धाशी संभाषण झाले होते, असे म्हटले आहे. त्यामुळे श्रद्धाचा खून नेमका कधी झाला, की आफताबने पोलिस आणि नाडारची दिशाभूल केली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.नाडार याने दावा केला की, जुलैमध्ये श्रद्धाने त्याच्याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला तेव्हा ती खूप घाबरलेली होती. मला वाचवा नाहीतर तो मला मारून टाकील, असा मेसेज तिने केला होता. हे मी त्याच्या घरच्यांनाही सांगितले. नाडारने यापूर्वी काही मित्रांसोबत श्रद्धाला छतरपूरच्या घरातून सोडवले होते. श्रद्धाची आफताबशी असलेली बांधिलकी पाहून तिने पोलिसांत तक्रार केली नव्हती व ते पुन्हा एकत्र राहू लागले. श्रद्धासोबत जुलै महिन्यात बोलणे झाले, ऑगस्टपासून संपर्क झाला नाही, असे तिची मैत्रीण शिवानी म्हात्रे हिने पोलिसांना सांगितले आहे. तसेच कोणत्याही मेसेजचा रिप्लाय आला नसल्याचे नाडारने सांगितले. पोलिस म्हणाले की, आफताबने श्रद्धा जिवंत असल्याचे भासवण्यासाठी तिचे इन्स्टाग्राम अकाउंट वापरले. तिचा मोबाइल सापडलेला नाही. आरोपीने त्याचा वापर केला असावा. श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडारशी व्हॉट्सॲपवर चॅट केले असण्याची शक्यता आहे.
श्रद्धाच्या मृतदेहाचे १२ तुकडे सापडले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मंगळवारी मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे.