मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेशी संबंधित नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पण, पोलिसांना या प्रकरणात अद्याप असा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. छतरपूर एन्क्लेव्ह परिसर, एमबी रोडच्या 100 फूट, पॅडी मिल कंपाऊंडच्या मागे आणि स्मशानभूमीजवळील नाल्याभोवती असलेल्या जंगलात मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा जंगलात शोध घेतला.
हत्येवेळी श्रद्धा प्रेगनंट होती अशा चर्चा सुरू आहेत. आफताब पोलिसांना जी काही माहिती देत आहे, ती सर्व माहिती बरोबर येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येपूर्वी श्रद्धा प्रेगनंट होती का, याचाही तपास केला जात आहे. हत्येच्या सहा महिन्यानंतर अवयव सापडल्याने ती गर्भवती होती की नाही याची माहिती मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृतदेहाचे अवयव शोधण्यासाठी मेहरौली पोलीस ठाण्याचे श्वान पथक बुधवारी सकाळी छतरपूरच्या जंगलात पोहोचले. मात्र, श्वान पथकाला अद्याप शरीराच्या अवयव सापडलेले नाही. मंगळवारी पोलिसांना जंगलातून एक पेल्विक हाड सापडले, जे श्रद्धाच्या पाठीचे असल्याचे सांगितले जात आहे. श्रद्धाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात हे पेल्विक हाड महत्त्वाचे ठरेल, असं पोलिसांनी सांगितले.
हत्येवेळी श्रद्धा प्रेगनंट असण्याची शक्यता दिल्ली पोलिसांना तपासात आढळून आली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा घरी किंवा तिच्या मोबाइल फोनवर आढळलेल्या चॅटवरून ती गर्भवती असल्याचा खुलासा होऊ शकतो. श्रद्धाचा कून केल्यानंतरही आफताबने तिचे इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाऊंट चालवले. जून महिन्यापर्यंत त्याने श्रद्धाचा मोबाईलही चालू ठेवला होता, मात्र तो कोणाशीही बोलत नव्हता आणि फक्त मेसेजच्या माध्यमातून उत्तर देत होता. 26 मे रोजी त्याने श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपयेही काढले होते.
आफताबला आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे. तो वसई भागात राहतो. हत्येचा उलगडा होण्याच्या काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कुटुंब येथून दुसरीकडे स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात येत आहे. "जोपर्यंत आफताब येथे राहत होता तोपर्यंत तो खूप शांत होता. त्याने कोणाशीही भांडण केले नाही, असं त्यांच्या एक शेजाऱ्याने सांगितले.
हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी पोलिसही अर्ज करू शकतात, मात्र पुरावे गोळा करण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत आहेत. सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलीस लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी पोलिसांना गेल्या वर्षभरातील आफताबच्या मोबाईलचे डिटेल्सही मिळत असून, त्यात हत्येपूर्वी आणि नंतर कधीतरी त्याच्या लोकेशनची माहिती मिळू शकते.