नवी दिल्ली: सोमवारी होणाऱ्या आफताब पूनावालाच्या नार्को टेस्टसाठी दिल्लीपोलिसांनी 40 प्रश्नांची लिस्ट तयार केली आहे. दरम्यान, शनिवारी पोलिसांच्या पथकांनी श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येच्या तपासासंदर्भात दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, डेहराडून आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांना भेटी दिल्या. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी प्रश्नांची लिस्ट तयार करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली. तसेच, चौकशीदरम्यान आफताब सतत आपले वक्तव्य बदलत आहे. भीतीचे कोणतेही संकेत दिसत नाहीत, तो आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे देत आहे. त्यामुळे नार्को टेस्ट आवश्यक आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
रिपोर्टनुसार, फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नार्को टेस्टला वेळ लागतो आणि नार्को टेस्टपूर्वी अनेक टेस्ट केल्या जातात. प्री-नार्को टेस्ट व्यक्तीचे वैद्यकीय मापदंड निर्धारित करतात आणि मानसशास्त्रज्ञांद्वारे केलेल्या विश्लेषणाचा समावेश असतो. फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञांच्या मते, ' नार्को टेस्ट ही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही तर मानसिकदृष्ट्याही असला पाहिजे. त्यानंतरच नार्को टेस्ट केली जाऊ शकते. ही एक जटिल टेस्ट आहे. टेस्ट करणारी टीम सर्वात आधी आफताबशी बोलेल आणि नंतर त्याची मानसिक स्थिती तपासण्यासाठी इतर टेस्ट केल्या जातील.
नार्को टेस्टदरम्यान आफताबला विचारले जाणारे प्रश्न, यात श्रद्धासोबतचे त्याचे नाते, तो तिला कसा भेटला, त्यांच्यातील वाद आणि भांडणाची कारणे काय होती, त्याच्या सवयी आणि नापसंती यांचा समावेश असणार आहे. तसेच, आफताबने केव्हा आणि कशी योजना आखली, त्यातून घडलेल्या घटना, त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले का आणि तसे असल्यास, त्याने अवयवांची विल्हेवाट कोठे लावली, यासारख्या प्रश्नांचा आणखी एक संच हत्येसंदर्भात लक्ष केंद्रित करेल.
एका पोलीस सूत्राने सांगितले की, "तपासकर्ते श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबच्या जीवनाबाबतही चौकशी करतील. त्याने खोली कशी साफ केली, पुरावे कसे नष्ट केले, मृतदेह कापण्यास कशासाठी प्रवृत्त केले, हत्येनंतर तो कोणाला भेटला किंवा फोन केला." दरम्यान, पोलिसांनी एफएसएल टीमसह छतरपूर पहाडी भागातील जंगलातून मानवी शरीराचे काही भाग जप्त केले आहेत. पोलिसांनी शोध मोहिमेदरम्यान मेटल डिटेक्टरचा वापर केला. मृतदेह कापण्यासाठी वापरलेली शस्त्रे किंवा उपकरणे देखील तेथे फेकली गेली होती का हे तपासण्यासाठी, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, पीडितेच्या शरीराचे अवयव परत मिळवण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी आरोपी आफताबला दक्षिण दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी नेले. मुंबईतील एका तपास पथकाने श्रद्धाच्या मैत्रिणीला आफताबसोबत असलेल्या संबंधांबद्दल विचारपूस केली. पोलीस आरोपीच्या वडिलांचा जबाबही नोंदवणार आहेत. आफताब आणि श्रद्धाने दिल्लीत येण्यापूर्वी काही काळ जिथे घालवला होता, त्या शहरांना एका टीमने आधीच भेट दिली आहे.