नवी दिल्ली - श्रद्धा वालकर हत्याकांडात पोलीस एका मागोमाग एक खुलासे करत आहे. हत्येच्या मूळापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांचे अनेक पथक विविध लोकेशनवर तैनात आहे. हत्या प्रकरणी आता नवीन खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी आफताब पूनावाला श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा हिशोब ठेवायचा. खूनाच्या प्लॅनिंगसाठी त्याने रफ नोट तयार केली होती. त्यात प्रत्येक छोट्या गोष्टीचा उल्लेख आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या मृतदेहाचे किती तुकडे कुठे फेकलेत याचाही उल्लेख रफ नोटमध्ये लिहून ठेवलाय. ही नोट पोलिसांच्या हाती लागलीय. त्याच आधारे पोलीस आता मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेत आहे. पोलिसांना आफताब आणि श्रद्धा राहत असलेल्या छतरपूर खोलीत रफ साइट प्लॅन सापडलाय. या रफ नोटचा उल्लेख दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिलेल्या अर्जात केला आहे. त्याचआधारे आता १५० हून अधिक पोलीस कर्मचारी जंगलातील प्रत्येक कोपरा तपासत आहेत.
डॉक्टर जबडा तपासत आहेतसोमवारी पोलिसांनी मेहरौलीच्या जंगलातून एक जबडा आणि काही हाडे जप्त केली. दिल्ली पोलिसांनी ते घेऊन डेंटिस्ट गाठला. जेणेकरून हा जबडा श्रद्धाचा आहे की नाही हे कळू शकेल. आता डॉक्टरांच्या पथकाने जबड्याची तपासणी सुरू केली आहे.
हत्येत वापरण्यात आलेला करवत आणि ब्लेड कुठे फेकला?आफताबच्या म्हणण्यानुसार, त्याने श्रद्धाच्या हत्येत वापरलेले करवत आणि ब्लेड गुरुग्रामच्या डीएलएफ फेज 3 च्या झुडपात फेकले होते. त्याचवेळी त्याने मेहरौलीच्या १०० फूट रोडवर असलेल्या डस्टबिनमध्ये चापड टाकली होती. दिल्ली पोलिसांच्या पथकाने गुरुग्राममध्ये दोनदा त्या झुडपांची तपासणी केली आहे. १८ नोव्हेंबर रोजी येथे तपास केल्यानंतर, दिल्ली पोलिसांच्या पथकाने गुरुग्रामच्या झुडपातून काही पुरावे बाहेर काढले, जे सीएफएसएल तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर १९ नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलीस मेटल डिटेक्टर घेऊन तपासासाठी गुरुग्रामला गेले, मात्र त्या दिवशी दिल्ली पोलीस रिकाम्या हाताने परतले.
मुंबईतील श्रद्धा वालकर खून प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला याला साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले. न्यायालयाने आरोपी आफताबच्या पोलीस कोठडीत पुढील चार दिवसांची वाढ केली आहे. विशेष सुनावणीत आफताबला न्यायालयात हजर करण्यात आले. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. त्यादिवशी मी जे काही केलं ती Heat Of The Moment होती असं आफताबने न्यायालयातील न्यायाधीशांना म्हटलं.