नवी दिल्ली- आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. आज त्याची नार्को टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये आफताबने महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या (न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा) तज्ज्ञ पथकाकडून आफताबची आज नार्को टेस्ट करण्यात आली. पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आजच्या नार्को टेस्टकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र नार्को टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे.
पोलिसांनी नोंदविली नव्हती श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार, तीन महिन्यांपूर्वीची घटना
नार्को टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाचा मोबाईल आणि श्रद्धाची जेव्हा हत्या केली, त्यावेळीचे तिचे कपडे कुठे फेकले, याचं उत्तरही आफताबने दिलं आहे. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी कोणती शस्त्रे वापरली आणि ती कुठे फेकली, याचा खुलासाही त्याने केला आहे.
आफताबने श्रद्धाच्या हत्येशी संबंधित रहस्य नार्को टेस्टमध्ये उघड केले असले तरी, ते पुरावे म्हणून न्यायालयात सादर करता येणार नाहीत. मात्र, पॉलीग्राफी आणि नार्को टेस्टच्या माध्यमातून पोलिसांना पुरावे शोधण्यात मदत होऊ शकते. आफताबने सांगितलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे जप्त केले तर या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळेल, असे मानले जात आहे.
त्या मुलीपर्यंत पोहोचले पोलीस-
श्रद्धा हत्याप्रकरणाबाबत जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यातच पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहेत की जीची आफताबसोबत नकळतपणे भेट झाली होती. तिच्याकडून काहीतरी माहिती मिळेल या हेतूनं पोलिसांनी प्रयत्न केला. आफताब एका डेटिंग अॅपचा वापर करत होता. त्यामाध्यमातून त्यानं अनेक मुलींशी मैत्री केली होती. याच डेटिंग अॅपच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या एका मुलीला त्यानं आपल्या घरी बोलावलं होतं. पोलिसांनी याच मुलीचा शोध घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही मुलगी व्यवसायानं मानसोपचारतज्त्र आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार तिच्याकडून आफताबबाबत काही महत्वाचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
श्रद्धाच्या वडिलांचे आफताबशी खटके-
श्रद्धा वालकर हिचे वसईत राहत असताना अनेकदा आफताबबरोबर खटके उडाले. त्यासंदर्भात तिने तुळिंज पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती, मात्र शेवटी आफताबने तिचा जीव घेतलाच. श्रद्धाची हत्या करून वसईत उजळ माथ्याने वावरणारा आरोपी आफताब पूनावाला हा माणिकपूर पोलिसांनी उशिरा दाखल केलेल्या तक्रारीमुळेच इतके दिवस गुन्हा करून उजळ माथ्याने वावरत राहिला, असे श्रद्धाच्या चुलत भावाचे म्हणणे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"