नवी दिल्ली : लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली. त्याने हा गुन्हा रागाच्या भरात केल्याची कबुली दिल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती हाती लागली आहे.
श्रद्धाचा मृत्यू होण्याच्या काही तासांपूर्वी तिने तिच्या मित्राला मेसेज केला होता. ती चॅट आता समोर आली आहे. श्रद्धाने १८ मे रोजी सायंकाळी मित्राला मेसेज केला होता. परंतु ही शेवटची चॅट असेल, असं श्रद्धानेही विचार केला नसेल. श्रद्धाने मित्राला मेसेज करुन म्हटलं होतं की, 'I Have Got News' म्हणजेच 'माझ्याकडे एक माहिती आहे'. श्रद्धाने यानंतर आणखी एक मेसेज केला आहे, त्यामध्ये 'मी एक गोष्टीमध्ये खूप व्यस्त आहे', असंही म्हटलं आहे. मात्र या मेसेजवरुन श्रद्धाला काहीतरी सांगायचे होते, असं दिसून येत आहे.
आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. आफताबला श्रद्धाचे अवयव शोधण्यासाठी दोन तलावांजवळ नेण्यात येणार आहे, त्यापैकी एक मेहरौलीच्या जंगलात आणि दुसरा येथील मैदानगढीमध्ये आहे. जेथे त्याने श्रद्धाचे अवयव फेकले अशा एका तलावाचे रेखाचित्रदेखील दिल्याची माहिती वकिलांनी दिली. हत्येनंतर मृतदेह कापण्यासाठी वापरलेले करवत व ब्लेड गुरुग्राममध्ये फेकून दिल्याचे सांगण्यात आले. त्याचा शोध पुन्हा घेतला जाणार आहे.
'आफताब गळा दाबून मारहाण करतोय'; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली, पण...
दरम्यान, आफताबने अतिशय शांत डोक्याने १८ मे रोजी श्रद्धा हिची हत्या केली होती. यानंतर ५ जून रोजी आफताबने वसईतील एव्हरशाइन येथील भाड्याच्या घरातील सामान दिल्लीत मागवले होते. मीरा रोड येथील एका कंपनीला हे काम दिले होते. कंपनीच्या गोविंद यादव याची दिल्ली पोलिसांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याने सामान शिफ्ट करताना झालेल्या व्यवहाराची पावती पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीला सामान शिफ्ट करण्यासाठी २० हजार रुपये आफताबने गुगल-पेद्वारे भरले होते. एक आठवड्यात आम्ही सामान दिल्लीला पाठवले, असे यादव याने पोलिसांना सांगितले.
आफताबचा जबाब अन् संपूर्ण यंत्रणा कामाला लागली; अख्खा तलाव रिकामा केला, पण...
दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली-
श्रद्धा आणि आफताब यांचे सुरुवातीपासूनच भांडणं सुरु होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे.
श्रद्धाने तक्रार दाखल केल्यानंतर तुळींज पोलिसांनी याबाबत कारवाई का केली नाही, तिने तक्रार मागे घेईपर्यंत पोलिसांनी वाट पाहिली, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, श्रद्धाच्या तक्रारीची माहिती देण्यास तुळींज पोलिसांनी टाळाटाळ केली असून ही माहिती तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर श्रद्धा आज या जगात असती, अशीही चर्चा रंगली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"