जळगाव : गिरणा नदी पात्रात बुडाल्याने शुभम उर्फ भवरलाल हिरालाल राजपूत (वय २६, रा.हिरा शिवा कॉलनी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता निमखेडी शिवारात घडली. शुभम याला पोहता येत नसल्यानेच त्याचा जीव गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शुभमच्या मृत्यूची घटना समजताच शेकडोच्या संख्येने तरुणांनी रुग्णालयात धाव घेतली. मित्र व कुटुंबाचा प्रचंड आक्रोश सुरु होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा शनिवारी मित्रांसोबत निमखेडी शिवारातील गिरणा नदीत गेलेला होता. तेथे काही लोक पाण्यात पोहत होते, शुभम याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात जायला घाबरत होता. पाण्यात उतरल्यावर खोल खड्डयाचा अंदाज न आल्याने त्यातच तो बुडाला. शेजारी पोहणारे तरुण व सोबतच्या मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने शासकीय रुग्णालयात आणले. रस्त्यात त्याचा श्वास सुरु होता. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटातच शंभराच्यावर तरुणांनी रुग्णालय गाठले. अनेक मित्रांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. कुटुंबातील महिलांचा तर प्रचंड आक्रोश सुरु होता.
जन्माला येण्याआधीच बाळाचे पितृछत्र हरपलेशुभम याचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. पत्नी प्रतिक्षा गरोदर असून माहेरी एरंडोल येथे गेलेली आहे. महिनाभरात ती प्रसुती होणार आहे. बाळाचा जन्म होण्याआधीच त्याचे पितृछत्र हरपले आहे. तर शुभम देखील बाळाचे तोंड बघू शकला नाही. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. शुभम याचा वाळूचा व्यवसाय होता, असे रुग्णालयात आलेल्या त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले.