डोंबिवली : लोढा हेवन परिसरात रेशनिंग दुकान चालविणाऱ्या राजेश गुप्ताची पत्नी श्वेताची हत्या झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. संशयावरून दुकानातील नोकर रंजनकुमार उर्फ गुडीकुमार सिंह याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हत्या केल्याचे समोर आल्यानंतर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. हत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. रंजनकुमारला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास राजेश, त्याची पत्नी श्वेता आणि नोकर रंजनकुमार, असे तिघे दारू पीत बसले होते. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याने राजेश दुकानाबाहेर निघून गेला. त्यानंतर नोकर रंजनकुमारने राजेशला मोबाइल करून तुमच्या पत्नीने स्वत:ला जखमी करून घेतल्याची माहिती दिली. राजेश ज्या वेळी घरात आला तेव्हा श्वेता ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. या प्रकरणी रंजनकुमार याच्यावर संशय व्यक्त केला गेल्याने त्याला चौकशीसाठी मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात अज्ञात कारणावरून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे; परंतु नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही.
बॉयफ्रेंड इम्रान कोण?ज्या वेळेला राजेश, श्वेता आणि नोकर रंजनकुमार तिघे जण दारू पीत बसले होते, त्या वेळी श्वेताने तिचा बॉयफ्रेंड इम्रानविषयी बोलणे सुरू केले. या रागातून राजेश दुकानाबाहेर निघून गेला होता. त्यानंतर तिची हत्या झाल्याची घटना घडली. श्वेताने बोलताना उल्लेख केलेला बॉयफ्रेंड इम्रान कोण? याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.
‘त्या’ हत्येचे गूढ कायम: शनिवारी कल्याण पश्चिमेतील दत्तआळी परिसरात एका ७० वर्षीय हंसाबेन या वयोवृद्ध महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास बाजारपेठ पोलीस करीत असून, त्या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.