- किरण शिंदे पुणे : पुणे शहर 9 नोव्हेंबर रोजी एका भीषण हत्याकांडाने हादरले. लग्नाला नकार दिल्याने उच्च शिक्षित श्वेता रानवडे (वय 22) या तरुणीचा भरदिवसा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला गेला. खून करून पळालेल्या प्रियकर प्रतीक ढमालेने जंगलात जाऊन गळफास घेत आयुष्य संपवले. श्वेताने घटनेच्या काही दिवस आधीच चतु:शृंगी पोलिसांकडे प्रतीकची तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नाही. चतुशृंगी पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता कारवाई झाली आहे.
पीएसआय वैशाली सूळ यांना निलंबित करण्यात आले आहे. तर वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पीएसआय शामल पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. प्रतीक आणि श्वेता दोघेही नातेवाईक होते. दोघांचेही 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचे लग्नही ठरले होते. मात्र अलीकडे प्रतीकची वर्तणूक खटकत असल्याने श्वेताने त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकत लग्नास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या प्रतिकने श्वेताच्या पोटात चाकूने वार करून तिचा खून केला. या संपूर्ण प्रकरणात चतुशृंगी पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला होता.
पोलिसांना लिहिलेल्या तक्रार अर्जात श्वेताने गंभीर आरोप केले होते. बोलणे बंद केल्यामुळे प्रतिकने श्वेताला खोटे बोलून भेटायला बोलावले आणि गाडीत जबरदस्तीने बसायला भाग पाडून दूर घेऊन गेला. श्वेता त्याच्यासमोर रडत होती, हात जोडत होती मात्र तो ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर श्वेताला प्रत्येकवेळी धमक्या दिल्या जात होत्या, नाही ऐकलं तर घरात घुसून तमाशा करू अशा धमक्या दिल्या गेल्या..त्याचा स्वभाव पटत नसल्यामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिणाम भोगायला तयार रहा म्हणून त्याने धमकी देखील दिली होती. एकत्र असताना काढलेल्या फोटो, व्हिडीओचा तो गैरवापर करू शकतो. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार तिने दिलेली होती. 22 सप्टेंबर रोजी श्वेताने पोलिसांना हा तक्रार अर्ज दिला होता.
गंभीर स्वरूपाचे आरोप असलेला तक्रार अर्ज आल्यानंतरही चतु:शृंगी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. दीड महिना आधीच आपल्यावरचे संकट श्वेताने ओळखले होते. त्याची कल्पनाही तिने पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी श्वेताच्या तक्रार अर्जावर कोणतीही कारवाई न केल्याने प्रतीकचे मनोधैर्य वाढले व 9 नोव्हेंबर रोजी त्याने श्वेताचा निर्घृण खून केला.