औरंगाबाद : सातारा परीसरात ९ मे रोजी भरदिवसा किरण आणि सौरभ या बहीण भावाच्या निर्घृण हत्या आणि १ किलो सोने लुटीच्या घटनेचा उलगडा झाला असून आरोपी जवळचे नातेवाईकच आहेत. गुन्हे शाखेने तपास करून दोन आरोपी आरोपीना बेड्या घातल्या आहेत. सतीश काळूराम खंदाडे - राजपूत( रा . पाचन वडगाव ) आणि अर्जून देवचंद राजपूत (रा . वैजापुर) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत . आरोपी सतीश हा मयत किरण आणि सौरभचा चुलतभाऊ आहे . तर आरोपी अर्जून हा सतीशचा मेहुणा आहे .
लालचंद खंदाडे आणि अनिता खंदाडे राजपूत या कुटुंबाकडे सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती सतीशला होती . अनिता आणि सपना या मायलेकी गावी आल्याचे पाहुन सतीशने मेहुणा अर्जुनला फोन करून लुटमारीचा कट रचला. यानंतर अर्जुन वैजापूरहून तर सतीश पाचनवडगावहून औरंगाबादला आले आणि त्यांनी किनकोरबेनगरात जाउन किरण आणि सौरभची हत्या केली आणि जवळपास १ किलो सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले होते.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मीना मकवाना , गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ . नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक अनिल गायकवाड , सहायक निरीक्षक गौतम वावळे , सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल , अमोल देशमुख आणि कर्मचारी यांनी शास्त्रशुद्ध तपास करून बुधवारी रात्री सतीश आणि अर्जुनला उचलले . आरोपीनी गुंह्याची कबुली देत लुटलेला माल पोलिसाच्या हवाली केला.