ग्वाल्हेर : चार भावंडे मुंबईतील त्यांच्या घरातून पळून गेली आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात रेल्वेतून उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली आहेत, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून, त्याने मात्र बालसंगोपन केंद्रात मुलांना सोडल्याचा दावा केला आहे.
जनकगंजचे पोलिस निरीक्षक विजेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक ८ ते १८ वयोगटातील तीन मुली आणि एका मुलाचा शोध घेण्यासाठी ग्वाल्हेर येथे दाखल झाले आहे. ही भावंडे २७ मे रोजी रेल्वेमधून उतरल्यापासून बेपत्ता आहेत.
मुंबई पोलिस दिलीप धकटा नावाच्या ऑटोरिक्षा चालकाची चौकशी करत आहेत. त्याने लक्ष्मीगंज परिसरातील बाल संगोपन केंद्रात मुलांना सोडल्याचा दावा केला आहे. ग्वाल्हेर स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकाला अटक केली, असे चौहान म्हणाले.
बालसंगोपन केंद्राचे कानावर हातमाधव बाल निकेतनच्या अध्यक्षा नूतन श्रीवास्तव यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या पथकाने २७ मे रोजी पंजाब मेलने प्रवास केलेल्या चार मुलांची चौकशी करण्यासाठी केंद्राला भेट दिली. आम्ही फक्त (जिल्हा) बाल कल्याण समितीच्या सूचनेनुसार मुलांना प्रवेश देतो. या चार मुलांना आमच्या केंद्रात सोडण्यात आले नाही. पोलिस केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरेदेखील तपासत आहेत. पत्रकारांशी बोलताना, ऑटोरिक्षा चालकाने दावा केला की, त्यांनी मुलांना २७ मे रोजी बालसंगोपन केंद्रात सोडले होते.