पुणे :
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील शार्प शूटर संतोष जाधव याचा शोध घेण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या एका पथकानं त्याला गुजरातमधून आज अटक केली. त्याला रात्री उशिरा न्यायालयात हजर केले. अधिक तपासासाठी न्यायालयाने २० जून पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याला दुजोरा दिला असून याबाबत अधिक माहिती सोमवारी सकाळी देण्यात येईल असे सांगितले. गेल्या सोमवारी मुसेवाला हत्याकांड प्रकरणात संतोष जाधव व सौरभ महाकाल यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केले होते.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी महाकाल याला संगमनेर जवळून अटक केली होती. त्याच्या चौकशी साठी पंजाब पोलिसांचे पथक पुण्यात आले होते. मंचर येथील राण्या बाणखेले खून प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून पुणे ग्रामीण पोलीस संतोष च्या मागावर होते, त्यासाठी त्याचा गुजरात, राजस्थान मध्ये शोध घेतला जात होता. तो बिष्णोई टोळीत सहभागी झाल्याची पोलिसांना माहिती होती. मुसेवाला हत्याकांड प्रकरणात त्याचे नाव आल्याने त्याचा शोध ४ राज्यात घेतला जात होता. अखेर गुजरातमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे पुण्याचं कनेक्शन उघड; दोन मोठी नावं आली समोर
संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचरची त्याची सासुरवाडी आहे. संतोष जाधव हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले यांच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून तो फरार होता. पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात संतोष जाधव याचे नाव निष्पन्न झाले होते. संतोष जाधव याच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात मोक्का कारवाई केली आहे. त्यानंतर संतोष जाधव हा पुणे परिसरातून दूर हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान भागात गेला असून तेथे त्याने गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे सांगितले जाते.