पुणे :
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील संशयित शार्प शूटर संतोष जाधव आणि त्याला आश्रय देणारा त्याचा मित्र नवनाथ सुरेश सूर्यवंशी अशा दोघांना गुजरातमधील भुज येथील मांडवी येथून पोलिसांनी अटक केली. मुसेवाला हत्याकांडात त्याचा किती सहभाग आहे, लॉरेन्स बिष्णोई टोळीशी कसा संपर्कात आला, याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यातून काही धागेदाेरे हाती लागतील, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी दिली. न्यायालयाने दोघांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.संतोष जाधव हा मंचरमधील राण्या बाणखेले खून प्रकरणात फरार होता. त्याचा शोध ग्रामीण पोलीस घेत होते. त्यातच गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये संतोष जाधव व सौरभ महाकाल यांचा संबंध असल्याची माहिती मिळाली. ग्रामीण पोलिसांची पथके गुजरात, राजस्थान, दिल्लीमध्ये शोध घेत होती. त्याचवेळी महाकाल याला संगमनेरजवळ पकडण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून संतोष जाधव याचा मित्र नवनाथ सूर्यवंशी याला पकडण्यात आले.
संतोषने बदलला पेहरावछोटी दाढी, कपाळावर गंध आणि गळ्यात माळ असा बिष्णोई टोळीचा पेहराव संतोष जाधव करीत असे. मुसेवाला प्रकरणात नाव समोर आल्यावर त्याने पूर्ण टक्कल केले. गळ्यातील माळ व गंध लावणेही बंद केले होते. नवनाथ सूर्यवंशी हा २०२१ पासून त्याच्याबरोबर असून, तो मूळचा सातारा जिल्ह्यातील खटावचा राहणारा आहे. त्यानेच संतोषच्या राहण्याची, जेवणाची सोय केली. स्वत:चे सीमकार्डही वापरायला दिले.