औरंगाबाद : विविध ब्रॅण्डची बनावट विदेशी दारू बनविणारा मिनी कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपायुक्तांच्या भरारी पथकाने छापा मारून उद्ध्वस्त केला. ही कारवाई सिल्लोड तालुक्यातील तलवाडा शिवारातील एका शेतवस्तीवर बुधवारी सायंकाळी करण्यात आली.
आरोपींकडून विविध ब्रॅण्डचा लेबल लावलेला बनावट दारूसाठा, रिकाम्या बाटल्या तसेच सुमारे २२ हजार बाटल्यांचे बूच आणि बाटली सीलबंद करणारे मशीन असा सुमारे ६ लाख १८ हजार ४६० रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी योगेश एकनाथ कावले आणि पंढरीनाथ एकनाथ कावले यांना अटक करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक आनंद कांबळे यांनी सांगितले की, तलवाडा येथील पावळ तलावाजवळील एका शेतात अवैध विदेशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर उपायुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी छापा मारला. त्यावेळी आरोपी दोन्ही भावांनी विदेशी आणि देशी दारूचा बनावट कारखानाच सुरू केल्याचे दिसून आले. तेथे बनावट दारूबनविण्यासाठी लागणाऱ्या बाटल्या, बूच सीलबंद करणारी मशीन आणि बनावट दारू बनविण्याकरिता लागणारे साहित्य असा सुमारे ६ लाख १८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. ही कारवाई दुय्यम निरीक्षक बी.के. चाळणेवार, पी.बी. ठाकुर, जवान व्ही.बी. मकरंद,आर. एम. भारती,एच. यू. स्वामी, सचिन पवार आणि कन्नड येथील दुय्यम निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केली.