शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टापाठोपाठ आता सिंधुदुर्ग सत्र न्यायलायानं दणका दिला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.
सुप्रीम कोर्टानं नितेश राणेंना १० दिवसांसाठी अटकेपासून संरक्षण दिलेलं असल्यानं पोलिसांना अद्याप नितेश राणेंना अटक करता येणार नाही. सुप्रीम कोर्टानं सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्ग न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांनी तब्बल साडेपाच तास युक्तिवाद केला. न्यायमूर्तींनी जामिनाचा निकाल मंगळवारी दिला जाईल, असे सांगत सुनावणी तहकूब केली होती. या सुनावणीदरम्यान नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला होता.