हरियाणाच्या पानिपतमध्ये सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेला पोलीस दलातील हेड कॉन्सेबल पोलिसांच्या खाऊगिरीला वैतागला आहे. पोलिसांच्या कार्यशैलीवर नाराज झाल्याने त्याने नोकरीचा राजीनामा पोलीस अधिक्षकांकडे दिला आहे. पोलीस आणि गुन्हेगारांची मिलीभगत आहे. तो गुन्हेगारांना पकडून आणत होता, पोलीस त्यांना सोडून देत होते. अशा वातावरणात पोलीस खात्यात नोकरी करणे शक्य नाहीय, असे कारण त्याने राजीनाम्यात दिले आहे.
आशिष हे हरियाणात सिंघम म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पानिपतमध्ये वाहतूक शाखेत हेड कॉन्स्टेबल या पदावर तैनात होते. त्यांनी जिल्हा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी मी सट्टेबाजांना पकडले होते. त्यापूर्वी ड्रगच्या तस्करांना पकडले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना चिरीमिरी घेऊन सोडून दिले. जिल्ह्यात नशेबाजी, तस्करी, सट्टेबाजी सारखे गुन्हे पोलिसांच्याच आशिर्वादाने सुरु आहेत. यामुळे मी राजीनामा देत असल्याचे आशिष यांनी म्हटले आहे.
या प्रकरणावर हरियाणाचा एकही बडा पोलीस अधिकारी बोलण्यास तयार नाहीय़. हेडकॉन्स्टेबल आशिष आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असायचे. पानिपतचे लोक आशिषना सिंघम म्हणतात. आशिष उर्फ सिंघमने अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सट्टेबाज आणि ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. आशिष राजीनामा घेऊन मिनी सचिवालयातील एसपी कार्यालयात पोहोचले तेव्हा सचिवालयात उपस्थित कर्मचारी आणि लोक आश्चर्यचकित झाले होते.
भाजपचे पानिपतमधील आमदार प्रमोद विजय म्हणाले की, आशिष चांगले काम करत आहेत. या प्रकरणाबद्दल नुकतीच मला माहिती मिळाली आहे. आशिष माझ्याकडे आले तर त्यांचे म्हणणे नक्कीच ऐकून घेतले जाणार आहे. त्यांच्या आरोपांची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.