मनीषा म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कायम अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मायानगरी मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी तुटपुंज्या मुंबई पोलिसांच्या मनुष्यबळाच्या खांद्यावर आहे. साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस असे सध्याचे चित्र आहे. मंजूर पदांपैकी १९ ते २० टक्के अद्यापही रिक्त आहेत. यात सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदांमध्ये सर्वाधिक ४१ टक्के तफावत आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वाकोटी आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी मात्र अवघा ४० हजार पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. एका खासगी संस्थेच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये मुंबई पोलीस दलात ५० हजार ६०६ पदे मंजूर होती. त्यापैकी ३९ हजार ५६१ जण कार्यरत होते. म्हणजे यात २२ टक्क्यांची तफावत आहे. याच प्रकारे २०१९ मध्ये मुंबईत मंजूर ५० हजार ४८८ पदांपैकी ४१ हजार ११५ जणांचा फौजफाटा कार्यरत आहे. कार्यरत पोलिसांपैकी बंदोबस्तासाठी सर्वाधिक मनुष्यबळ अडकून असते.टेक्निकल पोस्टकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. ५ हजार पदे मंजूर असताना अवघ्या २ हजार ८४४ मनुष्यबळावर काम सुरू आहे. याचा फटका गुन्ह्यांचा तपासावर होत आहे.पोलिसांवरील कामाचा अतिरिक्त भार वाढतच आहे. त्यामुळे निदान राज्यभरासाठी होणाऱ्या मेगा पोलीस भरतीतून तरी किमान ही तफावत कमी होईल, अशी आशा पोलिसांनाआहे.
साडेतीनशे मुंबईकरांसाठी एक पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 7:48 AM