कवठेमहांकाळ : टी.व्ही. बघण्याच्या कारणावरून सख्या बहिणीस दगडाने मारहाण करून खून केल्याचा गुन्हा सख्ख्या भावाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. रोहन बाळासो शिंदे (वय २८, रा. माळेवाडी सगरे मळा, कवठेमहांकाळ) असे संशयित भावाचे नाव आहे. तर रितू विशाल पवार (वय २६, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) असे मृत झालेल्या बहिणीचे नाव आहे. मारहाणीचा हा प्रकार दि.१९ एप्रिल रोजी कवठेमहांकाळ येथील माळेवाडी येथे घडला होता. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बाळासाहेब नामदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासह शहरालगत असणाऱ्या माळेवाडी येथे राहण्यास आहेत. त्यांची मुलगी रितू हिचे लग्न झाले असून सासर मणेराजुरी आहे. ती सुटीनिमित्त माहेरी माळेवाडी येथे आली होती. दि.१९ एप्रिल रोजी टी.व्ही. बघण्याच्या कारणावरून भाऊ रोहन याच्याबरोबर तिचा वाद झाला. यावेळी भावाने रागाच्या भरात बहिणीस शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. या मारहाणीत रितू हिचा जबडा फ्रॅक्चर झाला. या मारहाणीत रितू गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी मिरज येथे दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. दि. १६ मे रोजी उपचारादरम्यान रितू हिचा मृत्यू झाला.
दरम्यान, रितूवर हल्ला केल्याप्रकरणी भाऊ रोहन शिंदे याच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. रितूच्या मृत्यूनंतर रात्री उशिरा भाऊ रोहन याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत.