कल्याण - बिल्डर फसवणूक प्रकरणी एसआयटीने पाच जणांना अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या पाच जणांकडून आठ संगणक जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर १६ बँक खाती गोठविण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे सही शिक्के तयार करुन त्याद्वारे महापालिकेची खोटी बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासविले. या बनावट बांधकाम परवानग्या रेरा प्राधिकरणास सादर करुन रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. हे फसवणूक प्रकरण वास्तू विशारद संदीप पाटील यांनी उघड केले. या प्रकरणी महापालिकेने ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास एसआयटी करीत आहे.
एसआयटीने ४० बिल्डरांची बँक खाती गोठविण्याची कारवाई केली होती. या प्रकरणात एसआयटीने प्रियंका रावराणे, प्रवीण ताम्हणकर, राहून नवसागरे, जयदीप त्रिभूवन आणि कैलास गावडे या पाच जणांना अटक केली होती. या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तपास कामी पोलिस कोठडी सुनावली होती. एसआयटीने या पाच जणांकडून आठ संगणक जप्त केले आहेत. तसेच या पाच जणांशी संबंधित असलेली १६ बँक खाती गोठविण्यात आल्याची माहिती एसआयटी सूत्रांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी ४० बँक खाती गोठविण्याची कारवाई एसआयटीने केली होती. त्या पाठोपाठ आत्ता १६ बँक खाती गोठविण्याची कारवाई केली आहे.जप्त केलेल्या संगणकामध्ये फसवणूकी संदर्भातील डाटा तपासण्याचे काम सुरु आहे.