डाेंबिवली : किरकोळ वादातून एका व्यक्तीवर चार चाकी गाडी घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या साहाय्याने मानपाडा पोलिसांनी आजदे गावातील सहा आरोपींना अटक केली आहे.डोंबिवली एमआयडीसीतील एका कॅन्टीनमध्ये काही तरुण पार्टी करण्यासाठी बसले होते. पेंडसेनगर येथे राहणारा शशांक महाजन त्याच्या एका मित्रासोबत पार्टीत सहभागी झाला होता. त्या वेळी एका तरुणाशी त्याचा वाद झाला. या वादानंतर शशांक आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाला. त्याने घरी जाण्यासाठी ओला बुक केली. मात्र ओला वेळेवर आली नाही. त्यामुळे शशांक व त्याचा मित्र दोघे पायी घराकडे निघाले. ज्या तरुणासोबत शशांकचा वाद झाला होता. ते तरुण लाल रंगाच्या मोटारीमध्ये बसून शशांकच्या मागे आले. अगोदर शशांकला वाटले की, ही त्याने बुक केलेली ओला आहे. त्या मोटारीतून आलेल्या सहा तरुणांनी शशांक आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करून शशांकला रस्त्यावर पाडले. त्यानंतर चार चाकी गाडी त्याच्या डोक्यावर घातली. त्यानंतर ते पळून गेले. मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी संतोष डांबरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. शशांकला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. परंतु त्यापूर्वीच शशांकचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्ह्याचा उलगडाएका ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्हीत लाल रंगाची गाडी जाताना दिसली. या गाडीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढून घटनेनंतर तीन तासांच्या आत आरोपी सचिन पाटील, विनोद म्हात्रे, विनय लंके, निखिल सावंत, विक्रांत तांडेल आणि रोहित गुरव यांना बेड्या ठोकल्या.
तरुणाच्या अंगावर मोटार घालून केली हत्या, सहा आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 12:24 AM