पुणे : आपआपसात संगनमत करुन तब्बल 87 कोटी रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पुढील तपासासाठी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 जून पर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी खंड्णी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक यांनी फिर्याद दिली होती. रितेश रत्नाकर (वय 34, रा. कामोठे, नवी मुंबई), अब्दुलगणी रेहमततुल्ला खान (वय 43, रा. खुशिंदा टॉवर, नयानगर, ठाणे), तुफेल अहमद महंमद इसाक खान (वय 28, रा.अस्मिता पर्ल, ठाणे), शेख अलीम समद गुलाब खान (वय 36, रा. जेसीडी पार्क, प्रतिकनगर, येरवडा), सुनिल बद्रीनारायण सारडा (वय 40, कोंढवा बुद्रुक), अब्दुल रेहमान अब्दुलगणी खान (वय 19, रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 10 जुन रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोहगाव येथील संजय पार्क याठिकाणी घडली. या कारवाईत पाच मोबाईल फोन, 2 लाख 89 हजाराची रोख रक्कम, 1200 अमेरिकन डॉलर, भारतीय चलनातून बंद झालेल्या हजार, दोन हजार, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, मेटल डिटेक्टर, जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी या बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासवण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. अटक आरोपी यांनी 87 कोटी 5 लाख 75 हजार रुपयांची बनावट रक्कम जवळ कशासाठी ठेवली, ती रक्कम त्यांना कोठून मिळाली, तसेच ती कुठे छापली याचा तपास करणे, याबरोबरच आरोपींचे मोठे रँकेट आहे काय याचा तपास करणे, आरोपींनी ज्या बंगल्यातून बनावट नोटा ठेवल्या होत्या त्या बंगल्याच्या मालकाची माहिती घेणे, आरोपींनी आणखी किती जणांना फसवले आहे ? आणि शेख अलीम समद गुलाब आरोपी संरक्षण दलातील लान्स लाईक पदावरील कर्मचारी असून या गुन्हयात तो मुुख्य सुत्रधार असल्याने त्याच्याकडे सखोल तपास करण्यासाठी कोठडीची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
87 कोटींच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांना 15 जून पर्यंत कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 6:18 PM
विमानतळ पोलिसांनी कारवाई करत ८७ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या
ठळक मुद्दे विमानतळ पोलिसांची कारवाई