शिलाँग - मेघालयात मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मेघालयच्या ईस्ट जयंतिया हिल्स जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि डिटोनेटर जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गाडीत मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानंतर बुधवारी रात्री या भागात पोलिसांनी सर्च ऑपरेशन हाती घेतलं.
सर्च ऑपरेशन दरम्यान लाडरिमबाई पोलीस चौकी भागातील कोंगोंगमध्ये एका गाडीला पोलिसांकडून रोखण्यात आलं. आसाममधील रजिस्टर क्रमांक असलेली गाडी पाहून पोलिसांना थोडा संशय आला. सहाय्यक पोलीस महानिरीक्षक जी के इंगराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमधून दहा पेट्या जप्त करण्यात आल्या. या पेट्यांमध्ये 250 किलो स्फोटकं सापडली आहेत.
स्फोटकांमध्ये 2000 जिलेटीन कांड्याचाही समावेश होता. तसेच यासोबत 1000 डेटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी ही गाडी घेऊन जाणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. पोलिसांना आरोपींच्या चौकशीदरम्यान आणखी काही आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार खलीहरियट भागातून आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी घातलेल्या छाप्यात जवळपास 1275 किलो स्फोटके (10,200 जिलेटिन कांड्यांसहीत) 5000 डेटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. इंगराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत एकूण 1525 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध विस्फोटक कायदा आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.