लखनौ : उत्तर प्रदेशातील हिंदू संघटनेचा कार्यकर्ता कमलेश तिवारी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी तिघांना सुरतहून अटक केली आहे. या संशयितांनी आपला गुन्हा मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हे दहशतवादी कृत्य असल्याचे पोलिसांनी खंडन केले.
पोलिसांनी बिजनौरमधून मौलाना अनवर उल हक याला अटक केली. याशिवाय मौलाना मुफ्ती नईम काजमीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी कमलेश तिवारीला ठार करणाऱ्यास दीड कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे २०१५ साली जाहीर केले होते. कमलेश तिवारीने प्रक्षोभक व आक्षेपार्ह भाषण केले होते. लखनौमध्ये कमलेश तिवारी यांची शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती.
कमलेश तिवारी कार्यालयात बसले असताना दोन अज्ञात इसम भगवे कपडे परिधान करून तिथे आले. त्यांनी तिवारी यांच्याशी चर्चा केली आणि ते तिथे चहाही प्यायलये. नंतर त्यांनी तिवारी यांच्यावर गोळीबार केला आणि मिठाईच्या बॉक्समधून आणलेल्या चाकूने त्यांच्यावर वार करून पळ काढला.