मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानक समोरील मिड लाईफ या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिस उपायुक्त परिमंडळ १ च्या पथकाने धाड टाकून आतील छुपी खोली तोडून लपवलेल्या सहा बारबाला बाहेर काढल्या. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे यांना मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारमध्ये गाण्याच्या तालावर बारबालांकडून अश्लील नृत्य करवून घेत असल्याची माहिती व्हिडीओ क्लिपद्वारे मिळाली.
काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तूसाहेब लोंढे सह विनायक मगर, अजय मांडोळे, जितेंद्र उथळे, विनोद चव्हाण, विजेता नाईक यांच्या पथकाने रात्री धाड टाकली. मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पथकाने मेकअप रूमचा काचेचा आरसा असलेल्या खोलीच्या संरचनेत बदल करून तयार केलेल्या ७ फूट लांब आणि ४.५ रुंद अश्या छुप्या खोलीत दाटीवाटीने लपवलेल्या ६ बारबालांना अग्निशमन दलाच्या साहाय्याने बाहेर काढले.
बारबालाच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी तसेच अन्य कलमांखाली नवघर पोलीस ठाण्यात बारचा चालक - मालक, ११ ग्राहक, १० बार कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.