भिवंडी : मालमत्तेवर कमी कर लावण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या करमूल्यांकन विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्तांसह लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अटक केली. या घटनेने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.
कर मूल्यांकन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सुदाम जाधव व प्रभारी लिपिक किशोर केणे असे लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शहरातील एका मालमत्ताधारकास मालमत्तेवर कमी कर आकारण्यासाठी सुदाम जाधव यांनी दीड लाख रुपयाची लाच मागितली होती. तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बुधवारी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाधव व केणे यांना अटक केली.