पिंपरी : दुचाकीचा क्रमांक ओळखता येऊ नये म्हणून नंबरप्लेटवर चिखल लावून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे तीन साथीदार पळून गेले. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने सोमवारी (दि. २१) रात्री पावणे दहाच्या सुमारास ही कारवाई केली. अटक आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
राहुल रमेश चव्हाण (वय १९ , रा. भारत माता नगर, दिघी), शेखर संभाजी जाधव (वय २१, रा. मोघा, ता. उदगिर, जि. लातुर), करण गुरुनाथ राठोड (वय १९, रा. दिघी रोड, भोसरी), कृष्णा संजय तांगतोडे (वय २०, रा. पुणे, मु. पो. पाथर्डी, ता. जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. तर १७ वर्षीय दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही इसम दुचाकीवर दिघी येथे पाण्याच्या टाकीच्या बाजूला मैदानात संशयितरित्या थांबले आहेत. त्यांच्याकडे घातक शस्त्रे असून ते दरोडा घालणार आहेत, अशी माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक किरण काटकर व नितीन लोखंडे यांना मिळाली. त्यानुसार रात्री पावणेदहाच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावून सहा जणांना पकडले तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या सहा जणांमध्ये दोघेजण अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक सुरा, पाच कोयते, एक मोबाईल फोन, दोन दुचाकी असा एकूण ९० हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला. दुचाकींची ओळख पटू नये यासाठी आरोपी यांनी नंबर प्लेटवर चिखल लावला होता.
मोशी येथील काजळे पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याची कबुली आरोपींनी दिली. याप्रकरणी सशस्त्र दरोडा घालण्याची पूर्वतायरीचा दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आरोपी शेखर जाधव याच्यावर उदगीर शहर आणि उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे तीन तर भोसरी पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी कृष्णा तांगतोडे याच्यावर नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर, सिन्नर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी करण राठोड याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे.
खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अशोक दुधाणे, महेश खांडे, गणेश हजारे, उमेश पुलगम, किरण काटकर, नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड, निशांत काळे, आशिष बनकर, गणेश कोकणे, सागर शेडगे, राजेश कौशल्ये, प्रवीण कांबळे व सुधीर डोळस यांच्या पथकाने ही कारवाई केली.