मुंबई - दक्षिण मुंबईतील झव्हेरी बाजारातून अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकासह निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने २ कोटी १७ लाखांच्या रोकडसह सहाजण ताब्यात घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. ही सर्व रोकड निवडणुकीच्या धामधुमीत मतदारांना वाटण्यासाठी असल्याचा संशय पोलिसांना असून याचा अधिक तपास आयकर विभाग करत आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उमेदवारांनी पैसे वाटण्याचा सपाट सुरु केला आहे. ठिकठिकाणी भरारी पथकाद्वारे संशयित रक्कम ताब्यात घेतली जात असून कारवाई सुरु आहे. अशातच दक्षिण मुंबईतील झव्हेरी बाजारात काही व्यक्ती मोठ्या रक्कमेसह येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी याची माहिती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला दिली. दरम्यान दोन्ही पथकांनी झव्हेरी बाजारात शोध मोहिमेला सुरुवात केली होती. नेमके यातील सहाजण दोन बॅगा घेऊन संशायरीत्या उभे असल्याचे आढळून आले त्यावेळी त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता दोन्ही बॅगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याचं पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतली. रोकड मोजली असता ती २ कोटी १७ लाख असल्याची आढळून आले. ही रोकड कशासाठी आणि कोणाला देण्यासाठी आणली होती याची चौकशी केली असता यातील संशयिताणें ही रोकड सोने व्यापाऱ्यांची असून ते याठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आणल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी हे प्रकरण आयकर विभागाकडे पुढील तपासासाठी दिले आहे.