लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घराबाहेर खेळत असलेल्या नऊवर्षीय मुलीला पळवून नेत तिला नशेचे शीतपेय पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गणेश ऊर्फ गण्या सदावर्ते (वय २३) याला ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश (पोक्सो) व्ही. व्ही. वीरकर यांनी सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. अत्याचाराची कुठे वाच्यता केल्यास त्याने तिला ठार मारण्याचीही धमकी दिली होती.
पीडित मुलगी ३१ मे २०१५ रोजी रात्री आठच्या दरम्यान घराबाहेर खेळत होती. त्यावेळी गण्या याने तिला घरासमोरूनच तोंड दाबून तेथे उभ्या असलेल्या गाडीच्या मागे नेले. त्यानंतर त्याने तिला दारूसारखे नशा येणारे शीतपेय पाजून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार आई-वडिलांना सांगितल्यास ठार मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. कालांतराने पीडितेच्या पोटात दुखू लागल्यावर तिच्या आईने तिची वैद्यकीय तपासणी केली. याच तपासणीमध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानुसार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.
तपास पूर्ण झाल्यानंतर ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याच खटल्याची विशेष (पोस्को) न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे आणि नऊ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा सुनावली.
दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त शिक्षाआरोपीला सहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास ५० दिवस साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.