पुणे : देशी बनावट पिस्तुलांची मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे निर्मिती होत असताना त्याच्या वाहतुकीसाठी आता महिलांचाही वापर होत असल्याचे पोलिसांनी यापूर्वी केलेल्या कारवाईत आढळून आले आहे़. त्याचबरोबर आता ही बेकायदा शस्त्रे आॅनलाईनही उपलब्ध होवू लागली आहे़. पोलिसांनी आजवर घातलेल्या छाप्यात प्रामुख्याने पुरुषच पिस्तुल बाळगताना आढळून आले आहे़. त्यात आतापर्यंत तीन महिला गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन आल्या असताना त्या पोलिसांच्या तावडीत सापडल्या आहेत़. दिल्ली येथील जे़ डी़ बाई ने आजवर पाच वेळा शस्त्रे घेऊन विक्रीसाठी पुण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले आहे़. त्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून यापूर्वी शस्त्रे वाहतूकीसाठी रेल्वेचा वापर केला जात असे़. आता ही शस्त्रे घेऊन खासगी बस अथवा मोटारीने पुण्याच्या जवळपास येतात़. तेथून त्या दुसऱ्याकडे ही शस्त्रे देतात़. पुण्यात पोलिसांकडून कारवाई होत असल्याने आता अनेक गुन्हेगार हे पुण्यात शस्त्रे हस्तांतरीत करण्याऐवजी नगर, नेवासा येथे ज्याला पिस्तुल पाहिजे, त्याला बोलावतात़, त्याच्याकडे ही शस्त्रे दिली जातात़. पुणे पोलिसांनी स्वप्नील कुलकर्णी याच्याकडून अशाच प्रकारे १० शस्त्रे जप्त केली होती़. शस्त्रे आणताना ती मोटारीच्या स्टेपनीमध्ये ठेवून आणत असल्याचेही उघड झाले आहे़. आता शस्त्रास्त्रे विकणारेही आॅनलाईन पैसे स्वीकारत असल्याचे उघडकीस आले आहे़. ज्याला शस्त्रे पाहिजे तो शोध घेत असताना त्यांना शस्त्राची माहिती दिली जाते़. त्यानंतर त्यांना एका बँकेचा खाते क्रमांक दिला जातो़. या खात्यावर ठरल्याप्रमाणे पैसे जमा केले की तुम्हाला काही दिवसांनी एका ठिकाणी बोलावले जाते अथवा तुम्ही सांगाल तेथे तुम्हाला शस्त्र आणून दिले जाते़. निवडणुकीच्या तोंडावर परवाने असलेली शस्त्रे सरकारदरबारी जमा करावी लागतात़. पंरतु, इथे तर निवडणुकांच्या काळातच हे कारखाने जोमाने सुरु असतात़. याशिवाय गुंड आपला रुबाब दाखविण्यासाठी त्यांच्याकडून नियमितपणे खरेदीही करीत असतात़ अशांची माहिती पोलिसांना मिळते़. त्यांना पोलीस कर्मचारी सापळा रचून पकडतात़. पण, अशा गुंडांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत़. हे गुंड अशा शस्त्रांचा धाक दाखवून समाजातील अनेक व्यवसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसुल करण्याचे काम करत असतात़. एक पिस्तुल म्हणजे किमान एक खुनाचा प्रयत्न अथवा खुन असे गृहीत धरल्यास पोलिसांनी यावर्षी जवळपास १३० पिस्तुले पकडली आहेत़. त्याचा किमान एकदा वापर झाला असताना तर १३० गंभीर गुन्हे दाखल झाले असते़. पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर जामीन होतो़. त्यानंतर तो पिस्तुल बाळगत होता, हेच त्याच्यासाठी मोठे भूषण ठरते़ त्यातून त्याची दहशत वाढू लागते़ .
शस्त्रास्त्रांच्या अवैध वाहतुकीत महिलांचा होतोय ‘स्मार्ट’ वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 4:04 PM
शस्रास्र वाहतुकीत आता महिलांचाही वापर होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आढळून आले आहे़.
ठळक मुद्देशस्त्रास्त्रांचा विक्री व्यवहारही झाला आता आॅनलाईन