मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने बिल्डर व हॉटेल चालक खंडणीप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह अन्य दोघांवर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह, सचिन वाझे, सुमित सिंह आणि अल्पेश पटेल यांच्यावर आरोपपत्र दाखल केले, तर आरोपपत्र अन्य दोघे फरारी असल्याचे म्हटले आहे. दंडाधिकारी एस. बी भाजीपाले यांच्यापुढे हे आरोपपत्र सादर करण्यात आले.
आरोपींवर भारतीय दंडसंहिता कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, २०१, १२०(बी) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. बिल्डर व हॉटेल चालक बिमल अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या दोन हॉटेल्सवर छापा न मारण्यासाठी परमबीर सिंह, सचिन वाझे याने जानेवारी २०२० ते मार्च २०२० दरम्यान खंडणी मागितली. वाझेने नऊ लाख रुपये रोकड, तर २.९२ लाख रुपयांचे दोन स्मार्टफोन घेण्याची जबरदस्ती केली. साक्षीदारांच्या मते, वाझे, सिंह यांचा उल्लेख ‘नं १’ म्हणून करत खंडणीद्वारे जमा केलेले पैसे वाझे ‘नं १’कडे जमा करत. परमबीर सिंह व वाझे क्रिकेट बुकींना अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल करत. तसेच आरोपी अल्पेश पटेल याला गुजरातमधील मेहसाना रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. पटेलने गुन्ह्यासाठी वापरलेला मोबाईल फोन आणि सिम कार्ड नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.