वास्को - रविवारी (दि.२१) पहाटे गोव्याच्या दाबोळी विमानतळावर आलेल्या एअर इंडीया विमानातील तीन तजाकीस्तान राष्ट्रातील विदेशी महीला प्रवाशांकडून कस्टम विभागाने १ कीलो ७८७ ग्राम तस्करीचे सोन्याचे दागिने जप्त केले. ह्या विदेशी प्रवासी महिला तजाकीस्तान येथून दुबई मार्गे दाबोळी विमानतळावर उतरल्या असून त्यांच्याकडून तस्करीचे सोने आणण्यात येत असल्याची पूर्व माहीती कस्टम विभागाला मिळाल्यानंतर त्यांची कसून तपासणी करून सदर सोने जप्त करण्यात आले. दाबोळी विमानतळावर रविवारी पहाटे जप्त करण्यात आलेले हे तस्करीचे सोने ५८ लाख ३८ हजार रुपयांचे असल्याची माहीती कस्टम विभागाचे उपआयुक्त डॉ. राघवेंद्र पी यांनी दिली.रविवारी पहाटे दाबोळी विमानतळावर दुबईहून येणाऱ्या एअर इंडिया (एआ ९९४) विमानात काही प्रवासी तस्करीचे सोने घेऊन येत असल्याची माहीती विश्वसनिय सूत्रांकडून कस्टम विभागाला मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर कस्टम विभागाच्या उपआयुक्त डॉ. राघवेंद्र पी यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम अधिकाऱ्यांकडून ह्या विमानातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी करण्यास सुरवात झाली. सदर तपासणीच्या वेळी कस्टम अधिकाऱ्यांना ताजाकीस्तान राष्ट्रातील तीन विदेशी महिला प्रवाशांवर त्यांच्या हालचालीमुळे संशय निर्माण झाल्यानंतर त्यांची कसून तपासणी करण्यास सुरवात झाली. ह्या तपासणीवेळी सदर विदेशी महीलांनी घातलेल्या त्यांच्या अंतरवस्त्रात तसेच सामानात सोन्याचे दागिने लपवून आणल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सदर प्रकरणात कस्टम अधिकाऱ्यांनी चौकशीला सुरवात केली असता सदर दागिने अयोग्य मार्गाने तस्करी करून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कस्टम कायद्याखाली ते जप्त करण्यात आले. दाबोळी विमानतळावर रविवारी पहाटे कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या ह्या सोन्याच्या दागिन्यांचे एकूण वजन १ कीलो ७८७ ग्राम असल्याची माहिती उपआयुक्त डॉ. राघवेंद्र पी यांनी देऊन त्यांची किंमत ५८ लाख ३८ हजार रुपये असल्याची माहीती दिली. तस्करी करून आणलेले सदर सोन्याचे दागिने तजाकीस्तान राष्ट्रातील ह्या महिला येथून कुठे नेणार होत्या, तसेच सदर दागिने ह्या महीलांच्या मार्फत गोव्यात कोणी पाठवले होते. याबाबत सध्या तपास चालू असल्याची माहिती कस्टम विभागातील सूत्रांनी दिली. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.अडीच महीन्यात दाबोळी विमानतळावर जप्त केले १ कोटी ४ लाख ८५ हजार रुपयांचे तस्करीचे सोने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून अर्थात १ एप्रिल २०१९ ते आत्तापर्यंत गोव्याच्या दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने विविध कारवाई करून एकूण १ कोटी ४ लाख ८५ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहिती कस्टम विभागाचे उपआयुक्त डॉ. राघवेंद्र पी यांनी दिली. मागच्या अडीच महीन्यात जप्त केलेले सदर तस्करीचे सोने गोव्यात कशासाठी आणले होते व येथून नंतर ते कुठे जाणार होते अशा विविध विषयाबाबत सुद्धा चौकशी चालू असल्याचे त्यांनी माहितीत कळविले.