पालघर - मांडूळ प्रजातीच्या दुर्मिळ सापाची तस्करी करण्याऱ्या दोघांना पालघर गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या. बाजारात या सापाची दीड कोटी किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवसेनेचे पालघर पंचायत समितीचे माजी सभापती सुनील धानवासह एकाला अटक करण्यात आली आहे. सुनील धानवा याने २००९ साली शिवसेनेमधून बोईसर विधानसभेची निवडणूक लढवली होती. तर सध्या धानवा हे भाजप चे कार्यकर्ते आहेत. पालघरजवळील मनोर येथे ही कारवाई करण्यात आली.
पालघर तालुक्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीतील पोचाडे येथील एका घरात दुर्मिळ प्रजातीचे मांडूळ साप ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना होती. माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोचडे येथील एका घरात दोन गोणींमध्ये हे दुर्मिळ प्रजातीचे साप आढळून आले. वाइल्ड लाइफ वॉर्डन यांच्या परवानगीशिवाय मांडूळ प्रजातीचे २ दुर्मिळ साप बाळगल्याप्रकरणी २ आरोपींना पालघर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. सुनील पांडुरंग धानवा आणि पवन भोया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुनील धानवा हा पालघर जिल्ह्यातील चहाडे गावचा रहिवासी आहे. त्याने २००९ साली बोईसर विधानसभा निवडणूक लढवली होती. एक मांडूळ चार किलो वजनाचा असून त्याची किंमत 1 कोटी 20 लाख तर दुसऱ्या मांडूळाची किंमत ३० लाख रुपये आहे. या दोघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ३९ (३)सह ५१ (ब) अंतर्गत मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.