कोलकाता - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अक्षरश: गुटख्याच्या पुडीतून चक्क अमेरिकन डॉलर बाहेर निघत आहेत. ही घटना कोलकात विमानतळावरील असून येथील कस्टम विभागाने एका प्रवाशाला ताब्यात घेतलं असून या सर्व पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्ती अवैधपणे हे पैसे बँकाँकला घेऊन जात होता, अशी माहिती कस्टम विभागाकडून मिळाली.
संबंधित युवक पान मसालाच्या सीलबंद पाऊचमध्ये डॉलर लपवून तो घेऊन जात होता. मात्र, कस्टम अधिकाऱ्यांची नजर तरुणावर पडली अन् त्याची चोरी उघडकीस आली. या युवकाकडून ४० हजार डॉलर जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय चलनात या डॉलरची किंमत जवळपास ३२ लाख ७८ हजार रुपये एवढी आहे.
कोलकाता विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी ८ जानेवारी रोजी संबंधित युवकाला डॉलरची अशाप्रकारे तस्करी करताना अटक केली. शुद्ध प्लस पान मसाल्याच्या पाऊचमध्ये प्रत्येकी १० डॉलरच्या दोन नोटा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी बॅगमधील या गुटख्याच्या पुड्याला फोडून त्यातून डॉलर बाहेर काढले. विेशेष म्हणजे युवकाकडील ट्रॉली बॅग पूर्णपणे गुटख्याच्या पॅकेजने भरलेली होती.
एएनआय या न्यूज एजन्सीने यासंदर्भातील व्हिडिओ ९ जानेवारी रोजी शेअर केला आहे. त्यामध्ये, पान मसाल्याच्या पुडीतून डॉलर बाहेर निघत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.