लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराज्यीय हशिश ऑईलची तस्करी करणाऱ्या दुकलीला अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाई केली. मुंबईतली ही पहिलीच कारवाई आहे. आरोपींकडून २ कोटींचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने ही कारवाई केली आहे. मुंबई शहरातील तरुणांना अंमली पदार्थ विकणाऱ्या ड्रग पेडलर व विक्रेत्यांविरुदध कारवाई
करण्यात आली आहे. के. सी. रोड, बांद्रा परिसरातुन तमिळनाडू (मदूराई) येथून आलेल्या हशिश ऑईल अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना आझाद मैदान युनिटने अटक केली आहे. आरोपीकडुन दोन कोटी किंमतीचा एकूण २ किलो हशिश ऑईल जप्त करण्यात आला आहे.
हशिश ऑईल हा अंमली पदार्थ गांजा या वनस्पतींच्या भागांपासून किंवा भांग / चरसच्या अर्कातून तयार केला जातो. हशिश ऑईल हे द्रव स्वरूपात मिळत असून, त्याचा रंग सामान्यतः पारदर्शक सोनेरी किंवा हलका तपकिरी रंग किंवा टॅन किंवा काळसर असून, त्याचा वापर सेवनासाठी, धुम्रपानासाठी केला जातो.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाने २०२३ मध्ये एकूण ९९ गुन्हे नोंदवत, २०८ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ५० कोटीपेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ नप्त करण्यात यश आले आहे. मुंबई आयुक्तालयातील हशिश ऑईल हा चरस/हशिश/हशिश ऑईल एकच जातीतील अंमली पदार्थ असून, हशिश ऑईल जप्तीची ही मुंबई पोलीसांची पहिलीच कारवाई आहे. मात्र चरस हा अंमली पदार्थ जप्तीचे एकूण ९ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये १९ आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण ९ कोटी पेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे.