ठाणे : आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या मोहम्मद खलीद अली याच्यासह पाच जणांच्या टोळीला मुंबई आणि उल्हासनगरमधून अटक करण्यात आली. या टोळीकडून दोन हजार २३२ किलोच्या भांगेच्या गोळ्यांसह ३५ लाख ७३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. उत्तर प्रदेशमधून मुंबई, ठाणेे जिल्ह्यात आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची विक्री होणार असून, ती सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, चेंबूर येथून या गोळ्यांच्या मोठ्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाने २५ ऑक्टाेबर रोजी चेंबूरच्या सहकारनगर बसस्टॉपसमोर सापळा रचून दोन टेम्पोची झडती घेतली. या टेम्पोमधून परराज्यात तयार केलेला महाकाल मुनक्कावटी या नावाचा भांगमिश्रित पदार्थांचा साठा आढळला.
मुंबईतून चौघांना अटक याप्रकरणी मोहम्मद खालिद अली, इमरान हाफीज खान यांना अटक केली. चौकशीदरम्यान, लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनलच्या पूर्व भागातील रेल्वे स्टेशनच्या पार्सल ऑफिसबाहेर यातील अन्य एक मुख्य सूत्रधार फारुख शेख याच्याकडूनही भांगमिश्रित शिलाजीत वटी पदार्थाचा साठा हस्तगत केला. त्याला अटकही केली. त्याच्या चौकशीतून मुंबईतील गिरगाव भागातून शेख शबीर शफील मोहम्मद याच्याकडूनही असाच भांगमिश्रित शिलाजीत वटीचा साठा जप्त करत त्यालाही अटक केली.
उल्हासनगरातून एकाला बेड्या मिळालेल्या माहितीच्या आधारे उल्हासनगर क्रमांक एकमधून रवी कुकरेजा याच्याकडूनही अन्य भांगमिश्रित शिलाजीत वटीचा साठा जप्त करून त्यालाही अटक केली. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत दोन हजार २३२ किलो भांगमिश्रित पदार्थांचा साठा, दोन टेम्पो असा ३५ लाख ७३,४०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक केली आहे.