लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: दुर्मिळ जातीचे स्टार बॅक कासव तस्करीप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी एकाला मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून असे २० कासव त्यांनी हस्तगत केले आहेत. घरात भरभराट येईल या अंधश्रध्देमुळे त्याची मागणी अधिक असल्याने या टोळीच्या अन्य साथीदारांचा शोध घेत या मुक्या वन्यजीवांची त्यांच्या पासून सुटका करण्याच्या प्रयत्नात सध्या पोलीस आहेत.
अटक तस्कराचे नाव हे नदीम शुजाउद्दीन शेख (३३) असून तो मीरा रोडचा रहिवासी आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी लोकमत ला दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी एमएचबी कॉलनी पोलिसांच्या हद्दीत काही लोक स्टार बॅक कासवाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना मिळाली. त्यानुसार डॉ हिंडे यांनी पोलीस हवालदार घोडके व शिरसाट या पथकासह बोरिवली पश्चिमच्या गणपत पाटील नगर , गल्ली क्रमांक ४ याठिकाणी सापळा रचला आणि शेख याला अटक केली. त्याच्याकडे त्यांना २० दुर्मिळ कासव सापडले ज्याची किंमत ३ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शेखवर आम्ही वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ९, ३९, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप समोर आली नसून त्याला हे कासव पुरविणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी डॉ हिंडे यांनी सांगितले.
भरभराटीसाठी लाखोंना विक्री !स्टार बॅक कासवाची दक्षिण भारतात अधिक मागणी आहे. हे कासव जवळपास १ मिटर पर्यंत हे मोठे होते. त्यामुळे ते घरात ठेवत त्याची जितकी वाढ तितकीच आपल्या घरात भरभराट, असा समज असल्याने २० हजार ते १ लाख रुपये मोजून देखील त्याची खरेदी केली जाते. तसेच अनैसर्गिक प्रजननही करण्याचे प्रकार होतात.
म्होरक्या फरार...भारतीय हिमालयीन आणि उत्तर प्रदेशचे पहाडी पोपट तसेच मोरांची तस्करी या टोळीकडून करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार त्याच्या म्होरक्याचा शोध पोलीस घेत आहेत.