ठाणे- घोडबंदर भागातील कासारवडवली परिसरात व्हेल माशाच्या "उलटी"ची तस्करी करण्यासाठी येणाऱ्या देघांना ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 1 कोटी 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे आणि मुंबई परिसरातील संरक्षीत प्राणी असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्या अनुषंगाने यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून वेळोवेळी देण्यात आले आहेत. त्यानुसार १७ डिसेंबर रोजी मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर पथकाचे पोलीस निरक्षिक होनराव यांना मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक व्हेल माशाची उलटी बेकायदेशीर रित्या विकण्याकरीता ए. पी. शहा कॉलेज समोरील सर्व्हीस रोड, कासारवडवली परीसरात येणार होते.
त्यानुसार, सहाय्य पोलीस उपनिरिक्षक स्वप्निल प्रधान, पोलीस शिपाई ठाकरे आदींसह इतर सहकाऱ्यांनी या भागात सापळा रचला होता. त्यानुसार या ठिकाणी सुशांत सुरेश बेहरा (३२) (धंदा - जमीनीचे ब्रोकरेज काम, राहणार नायगाव पुर्व) व मनोज सुरेंद्र शर्मा (४०) (धंदा - सलुन, रा. नालासोपारा पुर्व) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, त्यांच्याकडून व्हेल माशाच्या उलटी सारखा दिसणारा पदार्थ, दोन मोबाईल फोन आणि एक मोटार सायकल, असा एकूण एक कोटी 20 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.