अमेरिकेचे राज्य मेरीलँडमध्ये एका घरात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा तेथील दृष्य पाहून पायाखालची जमीनच सरकली. घरात पडलेल्या त्या मृतदेहाच्या जवळपास १२४ साप होते. हे साप एकाच प्रजातीचे नव्हते, काही अतिविषारी देखील होते.
मेरीलँडच्या चार्ल्स काऊंटीमध्ये ही घटना घडली आहे. मृत व्यक्ती एक दिवस कोणाला दिसला नाही, म्हणून त्याचा शेजारी त्याला हाक मारण्यासाठी गेला होता. दरवाजावरची बेल वाजवून कोणी दरवाजा उघडला नाही तेव्हा खिडकीतून आत डोकावून पाहिले. तेव्हा हा ४९ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला होता. यामुळे या शेजाऱ्याने मदतीसाठी ९११ वर फोन केला. जेव्हा आपत्कालीन मदत कर्मचारी आणि पोलीस तिथे पोहोचले तेव्हा तो मृत झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी सांगितले की, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. सध्यातरी कोणत्या कटाचे पुरावे सापडलेले नाहीत. पोलिसांनी जेव्हा त्याच्या घराची तपासणी केली तेव्हा त्यांना वेगवेगळ्या आकाराच्या काचेच्या पिंजऱ्यांमध्ये १०० हून अधिक साप आढळले. यापैकी काही अति विषारी देखील होते. यामध्ये अजगर, रॅटल स्नेक, कोब्रा, ब्लॅक मांबा सारखे साप होते.
मेरीलँडमध्ये सापांना पाळण्यास मनाई आहे. यामुळे या प्रकरणात आता फॉरेस्ट खाते, पशू खात्याच्या अधिकाऱ्यांनाही तपास करावा लागत आहे. पोलिसांनी सांगितले की, गेल्या तीस वर्षांत अशाप्रकारची घटना पाहिलेली नाही. यासापांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.