आग्रा-
उत्तर प्रदेशच्या आग्रामधील मनखेडा नावाचं छोटसं गाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचं कारण म्हणजे रजत चाहर नावाचा एक तरुण आणि एका सापाची जीवघेणी कहाणी. पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय रजत चहरच्या मागे एक साप जणू हात धुवून लागला आहे. ज्या ज्या वेळी रजत घरात एकटा आढळून येतो त्यावेळी साप त्याला दंश करतो.
रजतच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर महिन्यात सापानं त्याला बऱ्याचदा दंश केला आहे. तो जिथं जिथं जातो. तिथं तो साप पोहोचतो. काळ्या रंगाचा साप असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. याआधी त्याला कोणताही त्रास होत नव्हता पण वारंवार दंश केल्यामुळे आता त्याची नजर कमकुवत होत असल्याचं त्याला जाणवू लागलं आहे.
रजत याला सापानं एक-दोन वेळा नव्हे, तर गेल्या १५ दिवसांत आठ वेळा दंश केला आहे. नुकतंच सोमवारी रात्री घरातील एका खोलीत तो एकटाच झोपला होता त्यावेळी याच सापानं त्याला दंश केला. रजत ओरडला तेव्हा कुटुंबीय जमा झाले आणि तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं.
गारुडी बोलावले, अनेकांची मदत घेतली तरी साप काही सापडेनारजत सोबत घडणाऱ्या घटनेनं गावात एकच चर्चा सुरू झाली आणि गावात सापाची दहशत पसरली. गावातील लोक चौकाचौकात याची चर्चा करू लागले. रजतची सुटका करण्यासाठी अनेकांनी अनेक सल्ले दिले. पण एकही सल्ला कामी आला नाही. सापाची सुटका करण्यासाठी गारुडीला बोलावण्यात आलं. पण साप काही येईना.
रजत उपचारासाठी एसएन मेडिकल कॉलेजमध्येही जाऊन आला आहे. याशिवाय गावातील एक वैद्य देखील सापानं दंश केल्यावर रजतवर उपचार करतात. रजतचे कुटुंबीय आणि गावकरी सगळे उपाय करुन थकलेत पण सापापासून काही सुटका झालेली नाही. एकही पर्याय उपयोगी ठरलेला नाही. रजतच्या कुटुंबीयांनी अनेकदा वन अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली. पण आतापर्यंत वन विभागाचा एकही अधिकारी त्यांच्या घरी आलेला नाही. सध्या साप आणि रजत यांच्यात जीवघेणा खेळ सुरूच आहे.