लातूर : शहरातील रिंगराेड परिसरात माॅर्निंग वाॅकला गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे गंठण चाेरट्याने हिसका मारून पळविल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात अज्ञात चाेरट्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सरस्वती नामदेव मुलगीर (६०, रा. बाेधेनगर, लातूर) या २२ ऑक्टाेबर राेजी सकाळी माॅर्निंग वाॅकला घराबाहेर पडल्या. दरम्यान, त्या लातूर शहरातील रिंगराेड परिसरात असलेल्या वसंतराव नाईक चाैकात आल्या असता एक २० वर्षीय तरुण त्यांच्या जवळ आला. काही कळायच्या आत त्या अज्ञात तरुणाने त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण हिसकावत पळ काढला. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, ताे तरुण पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेत १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल चाेरट्याने हिसकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चाेरट्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी भेट देऊन पाेलिसांनी पाहणी केली. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड करीत आहेत.
गंठण पळविणाऱ्या टाेळीचा वावर वाढला...
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत पहाटेच्या वेळी आणि सायंकाळच्या वेळी घराबाहेर एकट्या- दुकट्या फिरायला महिलांवर पाळत ठेवत, पाठीमागून माेटारसायकलवरून येत गळ्यातील दागिने, गंठण पळविण्याच्या घटना अलीकडे माेठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्याचबराेबर बंदघर, फ्लॅट फाेडणे आणि माेटारसायकली पळविण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. याप्रकरणी त्या- त्या पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, चाेरटे काही पाेलिसांच्या हाती लागत नसल्याने नागरिक, फिर्यादी कमालीचे त्रस्त झाले आहेत.
पत्ता विचारण्याचा बहाणा...
लातूर शहरात वेगवेगळ्या मार्गांवर सकाळ-सायंकाळच्या सुमारास फिरायला घराबाहेर पडणाऱ्या एकट्या आणि वयाेवृद्ध महिलांवर नजर चाेरट्यांकडून ठेवली जात आहे. दरम्यान, त्यांचा पाठलाग करत निर्मनुष्य परिसरात पत्ता विचारण्याचा बहाणा करत, काही बाेलत दिशाभूल केली जाते. काही कळायच्या आत गळ्यातील गंठण, दागिने हिसका मारून पळविले जात आहेत. हा प्रकार गत काही दिवसांपासून लातुरात घडत आहे. आता त्याचे प्रमाण वाढत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा झाला कैद...
लातुरातील रिंगराेड परिसरातील घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्यादी सरस्वती मुलगीर यांचे गंठण पळविणारा २० वर्षीय चाेरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ताे स्थानिक, महाराष्ट्रातील नसल्याची माहिती शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांनी दिली. ताे परराज्यातील असल्याने त्याचा शाेध घेतला जात आहे. यासाठी सायबर क्राइम शाखेची मदत घेतली जात आहे.