मध्यप्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यातल्या जनकगंजमध्ये राखी राठोड या 20 वर्षांच्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच जनकगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकशीत कुटुंबीयांनी आम्ही झोपेतून उठून पाहतो तर राखी सिलिंगला लटकली असल्याची खोटी बतावणी केली. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. राखीच्या गळ्यात असणारा फासाची गाठ ही वेगळ्या पदधतीने बांधण्यात आली होती. स्वतः फाशी घेणारी व्यक्ती अगोदर दोरखंड तयार करते आणि त्यात आपली मान घालते. राखीच्या गळ्याभोवती मात्र फाशीचा दोरखंड अगोदर गुंडाळला गेला आणि नंतर त्याला गाठ मारली गेल्याचं दिसून आलं.
तसेच ज्या ठिकाणी साडी बांधून ही फाशी घेण्यात आली, ती जागा खूपच उंचावर असल्याचं पोलिसांना जाणवलं. इतक्या उंचीवर राखीचा हात इतक्या सहजासहजी पोहोचणार नसल्याचं गृहित धरून दुसऱ्या कुणीतरी या जागी साडी लटकवली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी राखीचा भाऊ जितेंद्र आणि वडिल राजेंद्र यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आपणच तिचा खून केल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली.
राखीचं दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम होतं. जून महिन्यात घरातील काही पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली होती. नंतर कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार दिल्यानंतर राखीला शोधून पोलिसांनी कुटुंबियांच्या स्वाधीन केले होते. मात्र घरच्यांचा राग शांत झाला नव्हता. दुसऱ्या जातीतील तरुणाशी प्रेम घरच्यांना खपत नव्हतं अखेर तिघांनी तिला फासावर लटकवून तिची हत्या करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला. धक्कादायक म्हणजे क्राईमवर आधारित टीव्ही मालिका पाहून आपण हा कट आखल्याचं तिघांनी सांगितलं.