रांची - मध्ययुगामध्ये अपराध्यांना किंवा विरोधकांना भिंतीत चिणून मारण्यात आल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र आज २१ व्या शतकात असाच एक धक्कादायक प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. येथे जमिनीच्या वादातून एका १९ वर्षीय तरुणीला काही जणांनी भिंतीत जिवंत गाडले. मात्र सुदैवाने पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने तरुणीचे प्राण वाचले. ही घटना कोडरमा येथील जयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या योगिया टिलहा गावात घडली. जमिनीवर कब्जा करण्याच्या इराद्याने येथील काही गुंडांनी विरोधी गटातील तरुणीला घरातील एका खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर बाहेरून भिंत बांधून या तरुणीला आत बंदिस्त करून टाकले. ही तरुणी आतमध्ये सुमारे सहा तास अडकून पडली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भिंत तोडून या तरुणीला बाहेर काढले. या तरुणीचे वडील किशोर पंडित यांचा गावातील विनोद पंडित यांच्यासोबत जमिनीवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. ही तरुणी घरात एकटी असताना विनोद पंडित आणि त्याच्यासोबत ५-६ जण आले. त्यांनी या तरुणीला जबरदस्तीने खोलीत बंद केले. त्यानंतर बाहेरून भिंत बांधून तिला आतमध्ये कोंडून टाकले. या घटनेची माहिती परिसरातील कुणीतरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली. तसेच या तरुणीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली.
पीडित तरुणीने सांगितले की, तिला खोलीत बंद करून भिंत उभारण्यात येत असताना तिने आरडाओरडा केला. मात्र तिच्या मदतीसाठी कुणीही धावून आले नाहीत. दरम्यान तरुणीच्या आईवडलांना याबाबत समजल्यावर त्यांनीही तातडीने गावाकडे धाव घेतली.
रात्री उशिरा आपल्या मुलीला घेऊन रुग्णालयात पोहोचलेल्या किशोर पंडित यांनी सांगितले की, त्यांचा गावातीलच काही लोकांसोबत जमिनीवरून वाद सुरू आहे. जमिनीवर कब्जा करण्याच्या वाईट हेतूने त्यांनी मुलीला घरात बंद करून बाहेरून भिंत बांधली. या प्रकरणी जयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका महिलेला अटक करण्यात आली असून, पाच आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.