रायपूर - छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या भाजपा नेत्यासह चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. माजी नगरसेवक असलेल्या या भाजपा नेत्यावर वस्तऱ्याने हल्ला करून १० हजार रुपये चोरल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर हा भाजपाचा माजी नगरसेवक फरार होता. आता अटकेत असलेल्या आरोपीला पोलिसांना कान पकडायला लावून शहरातील रस्त्यांवरून त्याची धिंड काढली. त्यानंतर या सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १८ सप्टेंबरच्या रात्री माजी नगरसेवक अजय दुबे आपल्या काही सहकाऱ्यांसह महाराजार चौक येथील मोबाईल शॉपमध्ये घुसला होता. तिथून त्याने १० हजार रुपयांची लूट केली. जेव्हा दुकानदाराने विरोध केला. तेव्हा त्याने त्याच्यावर वस्तऱ्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दुकानदाराच्या चेहऱ्यावर आणि हाताला गंभीर इजा झाली. त्यानंतर पीडिताने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
मोबाईल शॉपमधील लूट आणि दुकानदारावर हल्ला केल्यानंतर आरोपीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याने व्हिडीओमध्ये दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दहशत माजवणाऱ्या या व्हायरल व्हिडीओमध्ये दुकान संचालकाला धमकावताना आणि त्याच्यासोबत मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पावले उचलत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.